Ajit Pawar : अजित पवारांच्या अडचणीत वाढ?; साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर Income Tax चे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 12:11 PM2021-10-07T12:11:07+5:302021-10-07T12:11:49+5:30
Income Tax raid : इन्कम टॅक्स विभागानं साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरावर छापे टाकले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Cm Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर गुरुवारी इन्कम टॅक्स (Income Tax Raid) विभागाकडून छापे टाकण्यात आले. यामध्ये दौड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर, पुष्पगनतेश्वर, नंदुरबार या कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर छापे टाकण्यात आले. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बारामतीचा दौरा केला होता. त्यानंतर हे छापे टाकण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
दम्यान ज्या संचालकांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत, ते अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणेला कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांच्या मदतीनं ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी सकाळी सात वाजल्यापासून या कारवाईला सुरूवात करण्यात आली.
किरीट सोमय्यांनी जरंडेश्वरला दिली होती भेट
यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली होती. तसंच या ठिकाणी लिलाव चुकीच्या पद्धतीनं केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. साखर कारखान्याच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच यासंदर्भातील कागदपत्रेही इन्कम टॅक्स आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना दिल्याचं म्हटलं होतं.
जरंडेश्वर साखर कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. कारखाना बंद पडण्याची भीती काही लोक दाखवतात, ती चुकीची आहे. हा कारखाना कुणी घेतला याचे उत्तर हिम्मत असेल तर अजित पवार यांनी द्यावं, असं आव्हानही सोमय्या यांनी दिलं होतं.