Deputy CM Ajit Pawar: विकासप्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करुन प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्यासह नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, वित्त व नियोजन, पाणीपुरवठा-स्वच्छता, आरोग्य, एमएसआरडीसी, एमएसआयडीसी, गृह, क्रीडा आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलीसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्रीएकवीरा मंदिर परिसरातील विकासाची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश अजित पवारांनी दिले.
कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटन पोलीस स्टेशन स्थापन करण्यात येतील. महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव, चाकण, शिक्रापूर परिसरातील महामार्गाचे रुंदीकरण, महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले.
कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. मंदिर परिसरात भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाची कामे करण्यात येत आहेत. वेहेरगाव येथील श्रीएकवीरा देवी मंदिर येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासंदर्भातील कामांना मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे भाविकांना अल्पावधीत मंदिरात पोहोचता येणार आहे. प्रकल्पाची गतीने उभारणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
दरम्यान, लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रूग्णालयाचे सुरुवातीच्या टप्प्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. उर्वरित कामांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच खडकाळे, वराळे, देहू नगरपंचायत पाणीयोजनांच्या कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला. या सर्व पाणीयोजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश दिले.