Ajit Pawar: राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाणार?; अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:21 PM2022-06-02T15:21:14+5:302022-06-02T15:22:13+5:30
Ajit Pawar: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा मास्क बंधनकारक केले जाईल का, याबाबत अजित पवार यांनी सरकारचे धोरण स्पष्ट केले.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेने मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. आता यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यात पुन्हा मास्कसक्ती करण्याचा पुन्हा निर्णय घेतला जाणार का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला असता, त्यांनी जर तरच्या भाषेत उत्तर दिले. दुसरीकडे, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाईल, अशी चर्चा असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी याच संदर्भात सरकारचे धोरण काय असेल याबद्दल सांगितले.
अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला डॉक्टर व्यास सर्व माहिती देतात. जगात काय चाललेय, देशात काय चाललेय, राज्यांमध्ये काय चाललेय, राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चाललेय हे आम्हाला सांगत असतात. या सर्व माहितीमधून सध्या एक पाहायला मिळातेय की, कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढतेय. मात्र व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेडवर फार कमी लोक आहेत, असे अजित पवार म्हणाले.
राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाणार का?
डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुस्टर डोस घेतला पाहिजे. अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी तो घेतला पाहिजे. दोन्ही डोस घेणाऱ्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तिसरा डोस घेतला पाहिजे, असे सांगत मास्क आमची त्यावर नजर आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे तेव्हा आम्ही लगेच मास्क बंधनकारक करु, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच मास्क बंधनकारक करण्याचा विचार करावाच लागेल. तुम्हाला कोरोना झाला तर आम्हाला कोण प्रश्न विचारणार, असा टोला अजित पवारांनी लगावला.
दरम्यान, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. यावरूनही अजित पवार यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आता तुम्ही बघा काही काही राजकीय नेते मास्क वापरत नव्हते त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला, असे अजित पवार म्हणाले.