खेड: महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. यशवंत जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीयांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली. यातून महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक डायरी प्राप्त झाली असून, यामध्ये अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. यानंतर यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावर भाष्य करताना, बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात, असे म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून, यामध्ये एक डायरी मिळाली आहे. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ दिले असून, गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याची नोंद आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर भाजप नेत्यांनी यशवंत जाधव आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी संयमित प्रतिक्रिया दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात
तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करेल. अशा प्रकारच्या चौकशा ज्यावेळी होतात त्यावेळी तुम्ही विचारता. पण यामध्ये यशवंत जाधव यांनी मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो असे उत्तर दिले आहे. बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात. काही जण आई म्हणतात तर काही मातोश्री म्हणतात. ते स्वतः सांगत असताना तुम्हा त्याला अधिक उकळी देण्याचे काम का करत आहात, असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला आहे.
यशवंत जाधव यांनी दावे फेटाळले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सदर दावे फेटाळले असून, आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे म्हटले आहे. आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. या संशयास्पद नोंदींशिवाय, न्यूजहॉक मल्टिमिडिया कंपनीशी अनेकविध प्रकारचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे. या कंपनीच्या मालकाचे नाव विमल अग्रवाल आहे. याचाही तपास केला जात आहे.