रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले, डावलले गेले का? अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 22:55 IST2025-04-12T22:54:02+5:302025-04-12T22:55:22+5:30
Deputy CM Ajit Pawar News: अर्थ खात्याच्या फाईल क्लिअर होत नाही, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचे सांगितले जात आहे. यावरही अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले, डावलले गेले का? अजित पवार म्हणाले...
Deputy CM Ajit Pawar News: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी रायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी मात्र रायगडावर वेगळीच बाब पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. अजित पवारांना डावलले गेले का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
कार्यक्रमात सर्वप्रथम खासदार उदयनराजे भोसले यांनी भाषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करणार होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यास सांगितले. एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे भाषण झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या सगळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले गेले.
रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले
यावर अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे कसे गेले पाहिजे, यासंदर्भाने रायगडावर चर्चा झाली. तसेच रायगडावर सर्वांनी भाषणे केली. पण वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, अर्थ खात्याच्या फाईल क्लिअर होत नाही, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली, अशी माहिती समोर येत आहे. यावर बोलताना, मला अमित शाह असे काहीही बोलले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणे बंद करा. सकाळपासून अमित शाह मुंबईला निघेपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. स्वत: देवेंद्र फडणवीस हेही सोबत होते, एकनाथ शिंदे देखील होते. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचे असेल तर आमचे संबंध चांगले आहेत. त्याच्यामुळे ते तिकडे तक्रार करतील असे अजिबात वाटत नाही. काही असेल तर ते थेट माझ्याशी बोलतील, मुख्यमंत्र्यांशी बोलतील. आम्ही वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करतो, त्यातून मार्ग काढतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.