DCM Ajit Pawar News: शिवसेनेत ऐतिहासिक बंड झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपाचा पाठिंबा घेत महायुतीचे सरकार स्थापन केले. यानंतर एका वर्षाने अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचाच कित्ता गिरवत राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठा गट घेऊन बाहेर पडले आणि महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये फुटलेल्या शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला अभूतपूर्व यश मिळाले. तर ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. परंतु, यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटातील काही नेते अजित पवारांकडे येण्यास इच्छूक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात. दोन्ही गटातील नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात. याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
अलीकडेच एका बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. तसेच राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटतात. एकमेकांशी संवाद कायम ठेवला आहे. शरद पवार हेच आपले दैवत असल्याचे दोन्ही गटांकडून वारंवार सांगितले जाते. तसेच राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चाही अनेकदा राजकीय वर्तुळात रंगत असते. यातच आता एका सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
शरद पवारांना कालही दैवत मानत होतो अन् आजही मानतो
आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. परंतु, आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता मिळालेला आहे. आज त्यांच्या पाठीशी उभे राहणे, देशाची प्रगती करून घेणे. जगात देशाचा मान-सन्मान वाढवण्याकरिता त्यांना पाठबळ देणे, हे आपले काम होते. म्हणून आपण त्या ठिकाणी गेलो. परंतु, सारखे आपले तळ्यात मळ्यात, काहीच कळत नाही. तसे होऊ देऊ नका. माझे दौरे मी महाराष्ट्रात वाढवणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अचानक अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याने जगातील अनेक देशात याचा परिणाम जाणवत आहे. कोरोनानंतर हे एक नवे संकट आलेले आहे. त्याचा आपल्याला सामना करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशात चांगले संबंध जोडलेले आहेतच, याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.