“पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी”: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:26 IST2025-02-27T10:25:30+5:302025-02-27T10:26:11+5:30

Deputy CM Ajit Pawar News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

deputy cm ajit pawar said swargate pune incident is extremely unfortunate and painful accused should be given the strictest punishment | “पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी”: अजित पवार

“पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी”: अजित पवार

Deputy CM Ajit Pawar News: विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरुणीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने पुणे हादरले असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेवर भाष्य केले. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक,  सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून, त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

कठोरात कठोर शिक्षा होईल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो.  पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

दरम्यान, अवघ्या १०० फुटांवर पोलिस चौकी, १८ सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांचा फौजफाटा असा सारा सुरक्षेचा सरंजाम असताना, दत्तात्रय रामदास गाडे या सराईत गुन्हेगाराने पीडितेच्या अज्ञानाचा आणि भाबडेपणाचा गैरफायदा घेत, तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. गाडे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Web Title: deputy cm ajit pawar said swargate pune incident is extremely unfortunate and painful accused should be given the strictest punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.