राजू शेट्टींच्या आमदारकीवरून पेच; अडचणीचा 'तो' नियम सांगत अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 02:23 PM2021-09-02T14:23:30+5:302021-09-02T14:27:30+5:30
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या फाईलवर अद्याप राज्यपालांकडून स्वाक्षरी नाही
मुंबई: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दलचा पेच अजूनही कायम आहे. ८ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारनं दिलेली यादी मंजूर केलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कालच राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली. त्या भेटीत १२ सदस्यांच्या यादीवर चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या यादीतील काही नावांवर राज्यपालांना आक्षेप असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका नियमाचा संदर्भ देत राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य केलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव १२ जणांच्या यादीत आहे. 'निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे. यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील,' असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यपाल नियुक्त ‘त्या’ १२ जणांच्या यादीतील काही नावांवर आक्षेप; जाणून घ्या कोणाचा पत्ता कट होणार?
संजय राऊत म्हणतात, राज्यपालांवर नक्कीच राजकीय दबाव
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नक्कीच राजकीय दबाव आहे. त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मंत्रिमंडळानं निर्णय घेतला, नावांची शिफारस केली की त्यावर स्वाक्षरी करण्याचं काम राज्यपालांचं आहे. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. ती सकारात्मक झाली आहे. त्यामुळे राज्यपाल १२ जणांचा समावेश असलेल्या यादीवर लवकरच स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.