“भाजपचे दोन, दोन्ही काँग्रेसचे दोन आणि सेनेचा एक असे पाच सदस्य राज्यसभेवर निवडून येणारच आहे. आता सहावा उमेदवार सेनेने दिला आहे. आमची मतेही शिवसेनेलाच देणार आहोत,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. गुरूवारी जनता दरबार उपक्रमादरम्यान अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यसभेची निवडणूक ही मते दाखवून मतदान केले जाते त्यामुळे घोडेबाजार होणार नाही. राहिला प्रश्न अपक्ष मतदान दाखवत नाही. त्यामुळे ही चर्चा सुरू आहे. कमी पडणारी मते सेना आणि भाजपला लागणार आहेत. काही अपक्ष सेनेशी संलग्न आहेत तर काही आमच्याकडे आहेत. काही भाजपकडेही आहेत. त्यामुळे घोडेबाजारच्या अशा चर्चा सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले.
“मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. न्यायालयात जात आहोत. मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यासंबंधाची परवानगी न्यायालयाकडे मागणार आहोत. प्रयत्न कसोशीने करत आहोत,” असेही अजित पवार यांनी सांगितले.