पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटं चर्चा झाली आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, त्याबद्दलचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या भेटीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीत नेमका संवाद झाला, त्याबद्दल प्रत्येकजण तर्कवितर्क लढवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीदेखील याबद्दल त्यांचा अंदाज सांगितला आहे.
मी सध्या शिर्डीत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली त्याची माहिती अद्याप मला मिळालेली नाही. त्यामुळे माहिती नसताना या भेटीबद्दल बोलणं उचित ठरणार नाही. दोन्ही मोठे नेते आहेत. त्यांच्यामध्ये विकासाच्या कामांसंदर्भात चर्चा झाली असावी, असं उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
थोड्याच वेळात अजित पवारांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या यादीबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांकडून नियुक्त होणाऱ्या १२ सदस्यांची यादी राजभवनाकडे पाठवली आहे. ही यादी पाठवून दीड वर्षे उलटून गेलं आहे, याची आठवण पवारांनी करून दिली.
काही दिवसांपूर्वी आम्ही शरद पवारांसोबतच्या बैठकीत राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा विषय उपस्थित केला. मंत्रिमंडळानं दिलेल्या यादीवर वर्ष उलटूनही राज्यपाल कार्यवाही करत नाही. आम्ही अनेकदा विनंती करूनही उपयोग झालेला नाही. याबद्दल वरिष्ठ पातळीवर बोला असं आम्हाला सांगितलं जातं. तुम्ही आमचे नेते आहात. म्हणून आम्ही या विषय तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही कृपया वरिष्ठ पातळीवर बोला, असं आम्ही शरद पवारांना सांगितलं होतं. त्यामुळे त्यासंदर्भात ही भेट असू शकते, असा अंदाज पवारांनी वर्तवला.