विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर अभिनंदनपर भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली. मविआचं सरकार आलं तेव्हाच मी सांगत होतो हे सरकार अनैसर्गिक आहे, हे टिकणार नाही. माझी खूप टिंगल टवाळी झाली. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. अनेकांनी टिंगल टवाळी केली. मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. ज्यांनी टिंगल टवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार. माझा बदला एवढाच की मी त्यांना माफ केलं. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक का मौका आता है, असं फडणवीस म्हणाले.
“मगाशी काही लोक इकडच्या लोकांवर ईडी ईडी असं ओरडत होते. होय, हे खरंच आहे. ही मंडळी ईडीमुळेच आलीयेत. पण ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहेत,” असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला. राजकारणात दोन्ही बाजू असतात, एकेका नेत्यावर ३० खटले टाकले. एका खासदारावर केस अशी टाकली की माझी गाडी देवदर्शनाला भाड्यानं नेली आणि पाच हजार रुपये दिले नाही. त्यांच्यावर ४२० ची केस लागली. गिरीश भाऊंवर मोक्का लागणार होता, बरं झालं असतं लागला असता तर, असं म्हणत त्यांनी मिश्किल वक्तव्य केलं.
“हनुमान चालिसा म्हटलं की घर तोडणार. मी तर म्हटलं मी नशीबवान आहे. रोज सरकारच्या विरोधात बोललो तरी घर तोडण्याचा स्कोप नाही, कारण मी सरकारी घरात राहतो. नागपूरचं घर पूर्ण नियमांत आहे. या दोन्ही बाजू आहेत. कोणी कोणाबद्दल वाईट लिहू नये. राजकीय लिहिल्यावर पोस्ट टाकल्यावर लोक जेलमध्येमध्ये आहे. दिल्लीमध्ये हुकुमशाही चाललीय असं सांगायचं. महिना महिना जेलमध्ये ठेवतो. हनुमान चालिसाचा कार्यक्रम मागे घेतला, तरी १२ दिवस महिला खासदाराला जेलमध्ये टाकलं, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.