काल दुपारी कळंबोली आणि पनवेल स्थानकांदरम्यान मालगाडी घसरल्याने विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. अपघातानंतर मार्गाच्या दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने यामार्गावरील अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. तर काही रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. अपघातामुळे काल संध्याकाळी वाहतूक बराच काळ खोळंबल्याने कोकण रेल्वेवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या बऱ्याच उशिरा रवाना झाल्या आहेत. तर पनवेल आणि मुंबईकडे येणाऱ्या गाड्या सुमारे चार ते दहा तास उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोळी विभागात एका मालगाडीचे पाच डबे काल दुपारी तीनच्या सुमारास रेल्वे रुळांवरुन घसरले होते. या आपघाताचा फटका कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना बसला आहे. काल रात्रीपासून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्या ४ ते दहा तास उशिराने धावत आहेत. त्यामध्ये सावंतवाडी मुंबई सीएसएमटी गणपती स्पेशल गाडी तब्बल दहा तास उशिराने धावत आहे. तर मडगाव-उधना गणपती स्पेशल गाडी १२ तास उशिराने धावत आहे. आज संध्याकाळी सावंतवाडीवरून दादरला निघणारी तुतारी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. मंगळुरू जंक्शन एलटीटी गणपती स्पेशल गाडी नऊ तास उशिराने धावत आहे.
तर मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या गाड्याही विलंबाने धावत आहेत. त्यामध्ये काल रात्री सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस आज सकाळी सहा वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकातून सुटली आहे. मात्र ती अद्याप पनवेलपर्यंतही पोहोचू शकलेली नाही. ही गाडी १२ तास उशिराने धावत आहे. तर मांडवी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस ही तीन तास उशिराने धावत आहे. रात्री दादर येथून सावंतवाडीसाठी सुटणारी तुतारी एक्स्प्रेस १२ तास उशिराने धावत आहे.
दरम्यान, या खोळंब्यामुळे प्रवासी संतप्त झाले असून, दिवा स्टेशनजवळ प्रवाशांना लोकल वाहतून अडवून धरली होती. तर दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी अनेक तास झालेल्या खोळंब्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच ट्रेन मध्येच उभी केल्याने प्रवाशांचे हाल झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.