आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : आप्पासाहेब पाटीलदोन्ही सभागृहात संख्याबळ नसतानाही राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही आणि त्याबाबत मी स्वप्न देखील पाहत नाही़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले़विधिमंडळ व संसदीय कार्यकिर्दीच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त व पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे खा़ शरद पवार यांचा सोलापुरात सर्वपक्षीय समितीच्या वतीने नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ त्यानिमित्त खा़ पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते़ शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रपतीपदाबाबतचे स्पष्टीकरण दिले़ यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ भारत भालके, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, आ़ दिलीप सोपल, आ़ सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, मनोहर सपाटे, बळीराम साठे, मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़ पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रवादीचे संख्याबळ अवघे १४ असताना मी राष्ट्रपतीपदाची स्वप्नं पाहणं योग्य ठरणार नाही़ दोन्ही सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संख्याबळ जास्त आहे़ शिवाय उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर मोदींच्या संख्याबळात वाढ झाली आहे़ त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल़सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट सुरू आहे़ त्यामुळे विविध राज्यांच्या निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळत आहे; मात्र ही लाट कायम राहणार नाही़ मोदी व भाजपासमोर कोणताही पक्ष सक्षम नाही. त्यामुळे लोक भाजपाच्या दिशेने मतदान करू लागले आहेत; मात्र ही परिस्थिती काही दिवसांनी बदलेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले़-------------------राष्ट्रवादीच्या मजबुतीसाठी दौरा करणारसध्या राज्यात राष्ट्रवादी पक्षाची अवस्था सर्वसाधारण नाही़ जिल्हा परिषद, पंचायत समिती, मनपा, नगरपालिका निवडणुकीने तर राष्ट्रवादी पक्ष शहरासह ग्रामीण भागातही विस्कळीत झाला आहे़ राष्ट्रवादीला पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यातील अनेक भागात दौरे करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.----------------साखर कारखाने पूर्वपदावर आणणारराज्यात पाण्याअभावी साखर कारखान्यांची परिस्थिती वाईट झाली आहे़ काही कारखाने अडचणीत सापडले आहेत़ राज्यातील साखर कारखाने पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीआय व नाबार्ड यांच्यासमवेत बैठक घेऊन कारखाने वाचविण्यासाठी योग्य तो तोडगा काढणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले़ --------------उजनीत येणारे घाण पाणी थांबविणारपुणे शहरातील ड्रेनेजचे घाण पाणी उजनी धरणातील पाण्यात मिसळत आहे़ पुणे महानगरपालिकेला मलनिस्सारण प्रकल्प उभा करण्याच्या सूचना केल्या आहेत; मात्र त्यासाठी ४५० कोटी रुपयांची गरज आहे़ त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत केल्यास उजनीत येणारे घाण पाणी थांबविण्यास मदत होईल, असेही शरद पवार यांनी सांगितले़ -------------अधिकाऱ्यांचा मनमानीपणा वाढला़़़़़सोलापूर जिल्ह्यात पाण्याचे नियोजन योग्य व्हायला हवे़ गरज नसताना उजनीच्या कालव्यातून पाणी सोडले जाते़ त्यामुळे भाजपा सरकारच्या काळात मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही़ त्यामुळे अधिकारी मनमानी कारभार करून वाट्टेल ते करतात़ हे थांबणे गरजेचे असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले़
राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहत नाही : शरद पवार यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2017 5:21 PM