डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात उंच डोंगरावर वसलेले आपटी गाव स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहिले आहे. या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, त्यापाठोपाठ आता आपटी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दळणवळणाची कोणतीच सुविधा नसल्याने येथे टँकरने पाणी देणेही शक्य नाही. पाण्यासाठी आपटीकरांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. येथील पारंपरिक पाणीसाठे संपुष्टात आले असून विहिरीला झऱ्याचे पाणी टिपून टिपून आळीपाळीने हंडे भरण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे. केवळ पाणी एके पाणी या एकाच कामासाठी येथील महिलांचा दिवस अन् रात्र खर्ची होत आहे. पाण्यासाठी महिलांची झोप उडाली आहे. आपटी या गावाकडे प्रशासनाचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगरमाथ्यावर वसलेले आपटी एक आदिवासी गाव. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरीही हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. दळणवळणासाठी कोणतीच सुविधा नसल्याने प्रशासनाच्या नजरेतूनही या गावाकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. रस्ता न मिळाल्याने आजही येथील गावकरी एक प्रकारे अज्ञातवासात राहत आहे. पिढ्यांमागून पिढ्या सरल्या, मात्र रस्ता होण्याऐवजी मागण्या-निवेदनांना प्रत्येक वेळी सरकारदरबारी केराचीच टोपली मिळत आली आहे. रस्त्याला वनविभागाच्या हरकतीमुळे आपटीच्या आदिवासींचे जीणे मुश्कील झाले असून कोणत्याच मूलभूत सुविधा नसल्याने या गावातील गावकरी त्रस्त झाले आहेत. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी फार वर्षांपूर्वी येथील गावकऱ्यांनी दोन विहिरी बांधल्या आहेत. मात्र या विहिरींचीही परिस्थिती अतिशय बिकट आहे. वर्षानुवर्षे डागडुजीची कामे न झाल्याने कठडे तुटलेल्या या विहिरी धोकादायक झाल्या आहेत. याच विहिरीच्या दगडावर एक पाय आत व एक पाय बाहेर ठेवून येथील महिला पाणी ओढत असल्याचे भयाण चित्र येथे पाहावयास मिळाले. या विहिरीपैकी गावाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या विहिरीचा वापर गावकरी वापरण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी करतात.
आपटी गावच्या महिलांची पाण्यासाठी वणवण
By admin | Published: April 27, 2016 1:39 AM