कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये रास्ता रोको करत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. मराठा समाज मोठ्या संख्येने जमला आहे. बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात तणाव निर्माण झाला आहे.
कोल्हापूरात लाल-पिवळ्याची होळी केल्याचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याचे संदेश शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्यानंतर समाजकंटकांकडून पाठविण्यात येत आहेत. तसेच रंग ओतण्याचा व्हिडीओही व्हायरल या समाजकंटकांनी व्हायरल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे पडसाद बेळगाव आणि कोल्हापूरमध्ये उमटले. रात्री उशिरा बेळगावमधील संभाजी महाराज चौकात मराठी भाषक जमले आणि रास्ता रोको केला तर यावेळी संतप्त शिवप्रेमी हुतात्मा चौकातील पोलिसांची गाडी फोडली, रामदेव गल्लीत एका रिक्षा चालकाला मारहाण केली. कोल्हापूरमध्ये कन्नड भाषकांची दुकान आणि हॉटेल बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे.