उरुळी कांचन : येथे पालखीच्या मुहूर्तावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, तुरळक पावसाने या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रासले आहेत. शिंदवणे रोड परिसर, आश्रम रोड परिसरात कचराकुंडीतून कचरा रस्त्यावर आला आहे. तसेच कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. कचरा रोजच्या रोज उचलून नेण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. उरुळी कांचन गावात ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात कचराकुंड्यांचे नियोजन केले आहे. पण, कचरा उचलण्यासाठी लागणारी वाहने कमी असल्याने हा कचरा रोजच्या रोज उचलला जात नसल्याने त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. भाडेकरूंची संख्याही झपट्याने वाढत आहे. नोकरदारवर्ग कामाला जाताना घरातील कचऱ्याची प्लॅस्टिकची पिशवी कचराकुंडीत न टाकता पायी जाताना किंवा दुचाकीवरून जाताना कचराकुंडीजवळ रस्त्यावरच फेकून निघून जातो. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नागरिकांनी कचरा कचराकुंडीत टाकावा व शिस्त पाळावी, असे आवाहन उपसरपंच सुनील कांचन यांनी केले आहे. या साचलेल्या ढिगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास येथील स्थानिकांना होत आहे. >गाड्यांचे प्रमाण कमीदररोज कचरा उचलण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण, कचरा उचलणारे वाहन बंद पडले, की मोठी समस्या निर्माण होते. सोमवारी कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. कारण रविवारी सुटीचा दिवस असतो. वाहन दुरुस्त झाले, की तातडीने हा कचरा उचलून पालखीच्या वेळी गावात घाण होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत.- कैलास कोळी, ग्रामविकास अधिकारी
उरुळी कांचनला कचऱ्याचे साम्राज्य
By admin | Published: July 02, 2016 1:58 AM