मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या वसुली आरोपाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने शुक्रवारी देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलाला पुन्हा समन्स बजावले आहे. ईडीच्या कारवाईविरोधात केलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलल्याने ईडीने ही कारवाई केली आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला १०० कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबईतील बार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचा मार्ग देशमुखांनी सचिन वाझेला सांगितल्याचे सिंह यांनी पत्रात म्हटले होते.ईडीने बजावलेल्या तिसऱ्या समन्सनंतर देशमुख नॉट रिचेबल झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. ईडीकडून देशमुखांना अटक केली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. ईडीने देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त केली आहे. देशमुख यांनी चौकशीला हजर न राहता ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने देशमुख यांना दिलासा न देता यावरील सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतर ईडीने शुक्रवारी अनिल देशमुख व ऋषिकेश देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
देशमुख पिता-पुत्रास ईडीकडून पुन्हा समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:04 PM