नागपूर विद्यापीठ : उद्या अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीखनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कुलगुरुपदासाठी इच्छुक असलेल्यांनी ‘मी त्यातला नाहीच’ असे दाखविणे सुरू केले आहे. उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे किंवा करणार आहे हे सांगण्याचे बहुतांश उमेदवार टाळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठ प्रशासन व प्राधिकरणांतील काही उमेदवारांचादेखील इच्छुकांमध्ये समावेश आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी अखेरची तारीख आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी १२ जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर विद्यापीठातून कोण कोण यासाठी अर्ज करणार यासंदर्भात उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु अर्ज करू शकणाऱ्या संभाव्य व्यक्तींनी आपण इच्छुक नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठातील काही ज्येष्ठ अधिकारी तसेच प्राधिकरणांतील आजी-माजी सदस्यांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. अजूनही दोन दिवसांचा अवधी असल्यामुळे ऐन वेळेवरदेखील दोन ते तीन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)तयारीला सुरुवातकुलगुरूंची निवड करताना संबंधित उमेदवारांची आवश्यक अर्हता, कौशल्य, अनुभव या बाबी तर विचारात घेतल्या जाणारच आहे. पण शिवाय विद्यापीठासाठी त्यांचे पुढील ‘व्हीजन’ काय असणार आहे यावरदेखील समितीचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी यादृष्टीनेदेखील तयारी सुरू केली आहे. एका उमेदवाराने तर चक्क ‘पॉवर पॉईन्ट प्रेसेन्टेशन’देखील तयार करून ठेवले आहे अशी माहिती प्राधिकरणातील एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.‘सीओई’, ‘एफओ’च्या मुलाखतींबाबत मौनदरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या ‘सीओई’ (कंट्रोलर आॅफ एक्झामिनेशन)व ‘एफओ’ (फायनान्स आॅफिसर) पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये मुलाखती कधी होणार यासंदर्भात उत्सुकता आहे. प्रशासनाने यासंदर्भात आपले धोरण स्पष्ट केलेले नाही. ‘सीओई’ पदासाठी १२ तर ‘एफओ’साठी सहा जणांचे अर्ज आले आहेत. ‘सीओई’ पदासाठी शशिकांत आसवले, एस.आर. देवकिशन, विनोद सयानकर, रायगड येथील डॉ. शरद फुलारी, नरेंद्र आंबटकर, विठोबा दडवे, अजित श्रीनपुरे, दिनेश बोंडे, ज्ञानेश्वर कढव, सुभाष चौधरी, संतोष कसबेकर यांनी अर्ज केला आहे. तर ‘एफओ’ पदासाठी एस.आर.देवकिशन, बबन राठोड, पंकज ठाकरे, डॉ.पुरण मेश्राम, एस.एस.भोगा व अजित श्रीनपुरे यांचे अर्ज आले आहेत.
कुलगुरुपदासाठी इच्छुकांचे ‘तो मी नव्हेच’
By admin | Published: February 05, 2015 1:07 AM