मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठ्या प्रमाणात मेगाभरती करण्यात आली. अनेक विरोधी पक्षाचे नेते भाजपाच्या गोटात सामील झाले. त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.
उदयनराजेंनी भाजपा प्रवेश केल्यामुळे सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शरद पवारांनी उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सुरुवातीला उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी त्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे विश्वासू शिलेदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपाच्या उदयनराजेंचा पराभव केला. मात्र त्यानंतरही आजतागायत उदयनराजे भोसले यांच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर अकाऊंटवर त्यांची ओळख लोकसभा सदस्य म्हणूनच आहे. उदयनराजे या दोन्ही अकाऊंटवर सक्रीय असतात. त्यांची शेवटची पोस्ट २८ नोव्हेंबरची आहे.
उदयनराजे यांचा पराभव झाल्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला होता. मात्र उदयनराजेंचे राजकीय पुनर्वसन करण्यात येईल असं भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच या बाबतचे सूतोवाच केले होते. खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यात महत्वाचे पद किंवा राज्यसभेत पुनर्वसन करण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार राज्यात पद मिळाले नाही तर राज्यसभेचे सदस्यत्व उदयनराजेंना मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले होते.
तसेच उदयनराजेंना भाजपा राज्यसभेवर घेणार असून कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंवर अन्याय होणार नाही, पक्ष योग्य सन्मान करेल असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे लोकसभेत पराभव होऊन राज्यसभेत सदस्य म्हणून गेल्यास शरद पवार आणि ते एकाच सभागृहाचे सदस्य होतील.