अनंत जाधवसावंतवाडी : दीपक केसरकर शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पण शालेय शिक्षण विभाग मिळाल्यानंतर सुरूवातीला केसरकर थोडे नाराज झाले होते. पण त्यांनी हा विभाग नंतर स्वीकारला, पण आता सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांत मात्र चांगलीच नाराजी पसरली आहे.
तर दुसरीकडे भाजपला पहिल्यांदाच सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद मिळाल्याने त्याच्यात उत्साहाचे वातावरण आहे. तर ठाकरे गटाला मात्र केसरकर यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद न मिळाल्याने आनंदाच्या उकळ्या फुटतना दिसत आहेत. शिवसेनेचे जे चाळीस आमदार फुटले त्यात सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांचा ही समावेश होता. केसरकर हे गेले अडीच वर्षे शिवसेनेवर नाराज होते. त्यांची नाराजी ही ऐनकेन प्रकारे जाणवत होती. केसरकर हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्याची मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक करत पहिल्यांदाच त्याना मानाचे स्थान देण्यात आले. त्यानंतर केसरकर यांची मुलख मैदान तोफ अशी काय धडाडली त्यांनी बघता बघता शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याना अंगावर घेत शिंदे गटाची बाजू देशभरातील समाज माध्यमात लावून धरली होती.
त्यामुळे केसरकर यांना मंत्री मंडळात मानाचे स्थान मिळणार हे निश्चित होते. पण चांगली खाती ही भाजपकडे गेल्याने केसरकर यांच्या पदरात शालेय शिक्षण खाते पडले. सुरूवातीला हा विभाग घेण्यास केसरकर थोडे उत्सुक नव्हते. पण नंतर केसरकर यांनी शिक्षण विभाग स्वीकारत या विभागाला न्याय देणार आणि बदल ही घडवणार असे सांगितले. मनासारखे खाते न मिळाल्याने त्याचे समर्थक तेव्हाही थोडे नाराज झाले होते. पण सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद मिळणार या आशेवर अनेकजण होते.
शनिवारी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली त्यात केसरकर यांच्या कडे सिंधुदुर्ग ऐवजी कोल्हापूर व मुबंई शहर ही जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. काही कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, तर काहींनी मुख्यमंत्र्यांनाच जाऊन भेटूया, असे सांगत स्वत:चे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.
तर दुसरीकडे भाजपला पहिल्यांदाच सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने मिळाले असल्याने भाजपच्या गोटात मात्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. पदाधिकारी कार्यकर्ते खूश झाले आहेत. आम्हाला अनेक वर्षांनी न्याय मिळाला असे त्याना वाटत आहे. तर दुसरी कडे केसरकर यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने ठाकरे गटात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटतना दिसत आहे. ठाकरे गट आता उघडपणे बोलत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच न्याय देतात असे सांगत केसरकर समर्थकांना चिमटे काढताना दिसत आहेत. मात्र या सगळ्यात केसरकर समर्थकांची परवड झाल्याचे दिसू लागले आहे.सिंधुरत्न माझ्याकडेच राहिलमुंबई शहराचे पालकमंत्रिपद मिळणेही साधी गोष्ट नाही. एक प्रकारे हा सन्मान आहे. सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार, पण सिंधुरत्नच्या माध्यमातून जिल्हा विकासात माझा निश्चित सहभाग असेल, असे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले.