प्रशांत माने । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : बीएसयूपी योजनेंतर्गत घरे मिळूनही साठेनगर वसाहतीतील लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. दिवाळीच्या आधी त्यांना घरांच्या चाव्या मिळाल्या. मात्र, पाणी आणि विजेच्या सुविधांअभावी ते उंबर्डे येथील बीएसयूपीच्या घरात राहिला जाऊ शकलेले नाहीत. त्याकडे केडीएमसीचे दुर्लक्ष होत असल्याने साठेनगरवासीयांच्या नशिबी ‘नरकयातना’ कायम आहेत. बीएसयूपी योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील कचोरे येथील १३२, कल्याण-इंदिरानगर ५२, डोंबिवली-इंदिरानगर समाधानवाडीत १०७ तसेच साठेनगर (उंबर्डे) येथील ४२ लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या आॅक्टोबरमध्ये देण्यात आल्या होत्या. मात्र, घरे मिळूनही साठेनगरवासीय त्या घरांपासून वंचित राहिले आहेत. वीज आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने त्या घरांमध्ये राहायचे तरी कसे, असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे त्यांना साठेनगरसारख्या अतिशय अविकसित भागांमध्ये राहणे भाग पडले आहे. आतापर्यंत साठेनगर वसाहतीतील ७० जणांचे बीएसयूपी योजनेंतर्गत पुनर्वसन झाले आहे. परंतु, उंबर्डे येथील इमारतींमध्ये पाणी आणि विजेच्या सुविधांची बोंब असल्याने या सदनिकांकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. या असुविधांबाबत वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याकडे लाभार्थ्यांनी लक्ष वेधले आहे.>स्थानिक नगरसेवकानेही केडीएमसीकडे केला पत्रव्यवहार स्थानिक नगरसेवक वरुण पाटील यांनीही प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांना पत्र पाठवून बीएसयूपीतील गैरसुविधा व पुनर्वसितांच्या हालअपेष्टांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यांची स्थिती अत्यंत बिकट असून पिण्याचे पाणी, वीज, बसवाहतूक यासारख्या शासनाने सक्ती केलेल्या सेवा परिपूर्ण देण्यास प्रशासन कमी पडत आहे. साठेनगर वसाहतीतील लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी पाटील यांच्याकडून गेल्या महासभेत लक्षवेधीद्वारे केली जाणार होती. परंतु, महापौरांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने पाटील यांच्याकडून लक्षवेधी मांडण्यात आली नाही. याउपरही परिस्थिती कायम राहिल्याने सुविधा देता येत नसेलतर पुनर्वसनाची घाई करता कशाला, असा सवाल पाटील यांनी केला आहे. >वानवा दूर करण्याचे काम सुरु - जोशीसध्या उंबर्डे येथील बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या इमारतींमध्ये विजेची आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता भेडसावत आहे. हे वास्तव आहे, परंतु यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. लवकरच या सुविधा लाभार्थ्यांना मिळतील, असा दावा बीएसयूपी प्रकल्प अभियंता सुनील जोशी यांनी दिली. सहा वर्षांपूर्वी विजेच्या सुविधेसाठी ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला होता. परंतु, तो तांत्रिक बिघाड होऊन नादुरुस्त झाला. ‘महावितरण’कडून तेथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून ६० लाखांचा खर्च सांगण्यात आला आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. विजेचा प्रश्न सुटल्यावर पाण्याची समस्याही निकाली निघेल, असे जोशी यांनी सांगितले. अन्यथा बेमुदत उपोषण : उंबर्डे येथील बीएसयूपीत प्रशासनाने योग्य प्रकारे सुविधा न दिल्यास बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया लाभार्थी कुटुंबातील गुलाब महादेव जगताप यांनी ‘लोकमत’ला दिली.
साठेनगरवासीयांच्या नशिबी नरकयातनाच
By admin | Published: July 13, 2017 4:26 AM