- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
देशभर दीड हजारहून अधिक घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला राज्यात प्रथमच नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून तो घरफोड्या करीत असताना केवळ दिल्ली पोलिसांनी यापूर्वी त्याला दोनदा अटक केलेली आहे. परंतु मागील काही वर्षांपासून नऊ राज्यांतले पोलीस त्याच्या शोधात होते. तरीही तो हाती लागला नव्हता.उंच इमारती व उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नदीम युसूफ कुरेशी (३८) उर्फ नादीर उर्फ कपिल त्यागी असे त्याचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशच्या गाझियाबादचा राहणारा असून, २० वर्षांहून अधिक काळापासून तो गुन्हेगारीत सक्रिय आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घडणाऱ्या घरफोड्यांची उकल करण्यासाठी उपायुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते. या पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक प्रदीप सरफरे व त्यांचे सहकारी प्रकाश साळुंखे यांना नदीम याच्याविषयी आठ महिन्यांपूर्वी माहिती मिळाली होती. तेव्हापासून त्यांचे पथक नदीमच्या मागावर होते. कोपरखैरणे, खारघर, सानपाडा तसेच सीबीडी येथील गुन्ह्यांमध्ये घटनास्थळी सीसीटीव्हीमध्ये तो दिसत होता. सीसीटीव्ही असतानाही तोंड न झाकता बेधडक घरफोड्या करणारा कोण, असा तपास करीत असताना त्याची दिल्लीतली गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली. शिवाय कोपरखैरणेतील गुन्ह्यात वापरलेल्या त्याच्या स्विफ्ट कारचाही नंबर मिळाला. त्याआधारे पोलिसांनी गाझियाबाद, मेरठ परिसर पिंजून काढला असता महत्त्वाचा सुगावा पोलिसांच्या हाती लागला. परंतु दोनदा त्याच्या अटकेची संधी निसटल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी यापूर्वी त्याला पकडणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे साहाय्यक उपनिरीक्षक विनय यादव यांची मदत घेतली. अखेर दिल्लीत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.त्याने देशभरात दीड हजारहून अधिक घरफोड्या केल्याची शक्यता आहे. त्यापैकी १३० गुन्हे दिल्लीतले असून, त्या प्रकरणी २०१० साली त्याला अटक होऊन शिक्षादेखील झालेली आहे. त्याशिवाय नवी मुंबईत सुमारे ४० तर पुण्यात २०हून अधिक गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर आहे. अशा गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक व हिमाचल अशा ९ राज्यांचे पोलीस त्याच्या शोधात आहेत. परंतु अद्यापपर्यंत तो कोणाच्याही हाती लागला नव्हता. ज्या घरांमध्ये किंवा सोसायटीत सीसीटीव्ही आहेत, त्या ठिकाणीदेखील तो उघड चेहऱ्याने घरफोड्या करायचा. श्रीमंतीचा आव आणत इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर बंद घरामध्ये घरफोडी करून पोबारा करायचा. नवी मुंबईतल्या अशा चार घटनास्थळी तो सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यावरूनच नदीमसह त्याच्याकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या रवी वर्मा व निखिल गुप्ता या सोनारांनादेखील मेरठ येथून अटक केली आहे. तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.संपत्ती नातेवाईकांच्या नावेदीड हजारहून अधिक गुन्हे करून त्यापैकी नवी मुंबईतल्या काही गुन्ह्यांची कबुली नदीमने देऊनही पोलीस त्याच्याकडून चोरीच्या मुद्देमालाची वसुली करू शकलेले नाहीत. चोरीचा ऐवज विकून त्याने नातेवाइकांच्या नावे संपत्ती जमवल्याचे समजते. तसेच ज्या सोनारांना त्याने चोरीचे दागिने विकले त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती प्रतिष्ठित असल्यामुळे त्यांच्याकडूनही वसुलीत तपास पथकाला अडथळा येत असल्याचे सूत्रांकडून समजते.