मुंबई : पत्नी शरीरसुख देण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही व त्यामुळे लग्नानंतर आपला तिच्याशी एकदाही शरीरसंबंध आला नाही, हे सिद्ध करण्यासाठी पती घटस्फोटाच्या दाव्यात पत्नीच्या वैद्यकीय तपासणीची मागणी करू शकतो, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.मुंबईतील कुटुंब न्यायालयाने एका घटस्फोटाच्या प्रकरणात जे. जे. रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डाकडून पत्नीची वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध पत्नीने केलेले अपील फेटाळताना न्या. के. के. तातेड यांनी म्हटले की, पतीला आपले म्हणणे सिद्ध करता यावे यासाठी पत्नीची अशी तपासणी करून घेण्याचा आदेश कुटुंब न्यायालयाने देण्यात काहीच गैर नाही. ही तपासणी ठराविक हेतूसाठी करायची असल्याने यास पत्नीच्या खासगी बाबींमध्ये हस्तक्षेप म्हणता येणार नाही.या दाम्पत्यामधील पती व पत्नी या दोघांचाही सन २०११ मध्ये हा पुनर्विवाह झाला होता. मात्र विवाह झाला असला तरी पत्नी शरीरसुख देण्यास शारीरिकदृष्ट्या अक्षम आहे व त्यामुळे लग्नानंतर आपला तिच्याशी एकदाही शरीरसंबंध आला नाही, या कारणावरून पतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्यात कुटुंब न्यायालयात साक्ष देताना पत्नीने असा दावा केला की, लग्नानंतर लगेचच तिचा पतीसोबत अनेक वेळा शरीरसंबंध आला होता. आपण शरीरसुख देण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही हे पतीचे म्हणणे खोडून काढण्यासाठी तिने एका खासगी डॉक्टरने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केले होते.कुटुंब न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देताना पत्नीच्या वतीने असा मुद्दा मांडण्यात आला की, साक्षी-पुरावे संपल्यावर प्रकरण युक्तिवादाच्या टप्प्याला असताना पतीच्या वतीने ही वैद्यकीय तपासणीची मागणी करण्यात आली. ती गैर आहे. शिवाय कुटुंब न्यायालय आपल्या स्वेच्छाधिकारात अशा प्रकारे खोदून मोहिती काढण्याचा आदेश देऊ शकत नाही. मात्र हे मुद्दे फेटाळताना उच्च न्यायालयाने म्हटले की, पत्नीची उलटतपासणी संपल्यानंतर तीन महिन्यांत पतीने आशा तपासणीसाठी अर्ज केला होता. त्यामुळे तो कायद्याला धरून होता.न्या. तातेड यांनी असेही म्हटले की, पती आणि पत्नी यांच्यात विवाहानंतर शरीरसंबंध आले होते की नाही यावर उभय पक्षांमध्ये वाद असेल तर त्याचा निर्णय करण्यासाठी पत्नीची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे ठरते. पत्नीने आधी सादर केलेला खासगी डॉक्टरचा अहवाल हा तिची वैद्यकीय तपासणी करून दिलेले प्रमाणपत्र असल्याचे सिद्ध होत नसल्याने सरकारी रुग्णालयात तिची तपासणी करण्यास सांगण्यात काहीच गैर नाही. (विशेष प्रतिनिधी)
घटस्फोटात पत्नीची तपासणी योग्य!
By admin | Published: September 11, 2016 3:57 AM