मुंबई - ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र ठेवू नका. किमान चार भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा अशी भूमिका उद्धव ठाकरे गटानं घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला तर पाडापाडीचे राजकारण होणार नाही असं ठाकरे गटाला वाटते. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही मागणी काँग्रेस आणि शरद पवार मान्य करणार का हा प्रश्न आहे.
महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी जाहिरपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला आवाहन केले होते. तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगा, मी त्याला पाठिंबा देतो. परंतु निवडणुकीआधी ते जाहीर करावं. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र वापरले तर पाडापाडी होते ते आपल्याला नको असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते. मात्र ठाकरेंच्या मागणीकडे काँग्रेस आणि शरद पवारांनी दुर्लक्ष केले होते.
याआधी युती आणि आघाडीचे राजकारण पाहिले तर ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री या सूत्रामुळे पाडापाडीचं राजकारण होते. महाविकास आघाडीत हा धोका आहे त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला तर रणनीती आखता येईल. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत त्यातच हा निर्णय घेतला जावा अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जावा असं ठाकरे गटाला वाटतं. मात्र काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गटाची भूमिका मान्य करते का हे पाहावे लागणार आहे. एबीपीनं याबाबत वृत्त दिले आहे.
मविआ मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होते?
आपल्यात काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो. जागावाटपावरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवले जायचे. पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते.
काँग्रेसचा स्पष्ट नकार
ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री झालं तर पाडापाडी होते असं उद्धव ठाकरे म्हणाले परंतु असं कधी होत नाही. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि आम्ही आमचे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री इथं ठरत नसतो तर तो श्रेष्ठी ठरवत असतात. पण एक गोष्ट चांगली झाली की लोकांमध्ये, माध्यमांमध्ये सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार असं वातावरण तयार झालं. निवडणूक होऊ द्या, जिंकून द्या, किती आमदार निवडून येतायेत ते बघू त्यानंतर सरकार कोण चालवेल हे नंतर ठरवता येईल. जागावाटप आणि निवडणुकीच्या कामाला लागणं हाच आमच्यासमोरचा विषय आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असं स्पष्ट विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मविआच्या मेळाव्यानंतर केले होते.