मुंबई, दि. 11 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित स्थळांना पर्यटनस्थळांचा दर्जा देणे व या स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाही गतिमान पद्धतीने राबवावी, असे निर्देश पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी निगडीत अशा पाच स्थळांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचतीर्थ म्हणून घोषित केले होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव महू, लंडन येथील निवासस्थान, नागपूर येथील दीक्षाभूमी, नवी दिल्ली येथील महापरिनिर्वाण स्थळ, मुंबई येथील चैत्यभूमी या स्थळांचा समावेश आहे. यातील दोन स्थळे महाराष्ट्रातील असून या व्यतीरिक्त सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेल्या स्थळांचा गतिमान विकास करण्यात यावा, असे निर्देश रावल यांनी दिले. घोषित स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय विभाग, पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची एकत्रित बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.या स्थळांच्या विकास कामासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कार्यवाही गतिमानतेने राबविण्यासंदर्भात ही समिती काम करणार आहे.लेण्यांच्या विकासासाठी तज्ज्ञांची बैठक-राज्यभरातील लेण्यांचा विकास करून पर्यटकांची संख्या वाढविण्यासंदर्भात राज्यभरातील लेणी तज्ञांची लवकरच बैठक बोलविण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर विकास कामे तातडीने राबविण्यात येतील अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. लेण्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासंदर्भात मंत्रालयीन दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले.मंत्रालयात आयोजित बैठकीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, आमदार गौतम चाबुकस्वार, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे आदी उपस्थित होते.
बाबासाहेबांचं वास्तव्य लाभलेल्या स्थळांचा विकास जलदगतीने करा : जयकुमार रावल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 7:13 PM