शिवाजी गोरे । लोकमत न्यूज नेटवर्कदापोली : मधुमेह रुग्णांनाही मनसोक्त भात खाता येईल, असे ‘रत्नागिरी - ७’ हे वाण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. यामध्ये झिंक व आयर्नचे प्रमाण जास्त असून, हेक्टरी ४० ते ५० क्विंटल उत्पन्न मिळते. हा लालसर भात चवदार असून, गरोदर महिलांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.गोरगरीब लोकांना सकस आहार मिळत नसल्यामुळे शरीरात कॅल्शियम, झिंक, आयर्नची उणीव भासते आणि त्यांना अनेक रोगांना बळी पडावे लागते. परंतु, रत्नागिरी - ७ या जातीत झिंक, आयर्नचे प्रमाण अधिक असल्यामुळे ही जात गरिबांसाठीही लाभदायक आहे. भात खाल्ल्याने रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी भात खाऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात. परंतु ‘रत्नागिरी - ७’ या या वाणाचा भात मधुमेहींनाही मनसोक्त खाता येईल. भाताच्या इतर जातींच्या तुलनेत याचे उत्पादन तिप्पट आहे. इतर जाती १३५ ते १४० सेंटीमीटर उंच असतात. वारा-पाऊस झाल्यास त्या जमिनीवर लोळतात. त्यामुळे बरेच नुकसान होते. परंतु या वाणाची उंची ११० सें.मी. एवढी आहे. भाताचा दाणे जाड आखूड व आकर्षक असून चवदार भात होतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.मधुमेहींबरोबरच गरीब व सामान्य कुटुंबांसाठी हे वाण खूपच फायदेशीर ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, मेळघाट, भामरागड या आदिवासी भागात अजूनही अनेक गरीब महिलांना सकस आहार न मिळाल्याने गरोदरपणात व बाळंतपणानंतर लोह व झिंकचे प्रमाण कमी पडते. मात्र ‘रत्नागिरी -७’ या भातातून शरीराला लोह व झिंक मिळणार असल्याने मातांना हा भात वरदान ठरणार आहे - डॉ. तपस भट्टाचार्य, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीरत्नागिरी - ७ या जातीचे बियाणे शेतकऱ्यांना पुढील हंगामापासून उपलब्ध होणार आहे. हे बियाणे सहज उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठ भात संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर तयारी सुरू आहे.- डॉ. भरत वाघमोडे, भात शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ, दापोली
मधुमेही रुग्णांसाठी भाताचे वाण विकसित
By admin | Published: June 19, 2017 2:33 AM