यवतमाळ : आपण आपल्या शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करतो. तसाच केंद्र सरकारने शिक्षणाचाही डीपी तयार करावा. सध्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मागणी कमी पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. डीपी तयार असल्यास कोणत्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी असेल, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची निवड करता येईल. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांची निराशा टळू शकेल, अशी आशा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१८’ स्नेहसंमेलनाचे तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विजय दर्डा होते. सचिव किशोर दर्डा, उच्च व तंत्र शिक्षण मंडळाचे विभागीय सहसंचालक डी. व्ही. जाधव, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, समन्वयक डॉ. पी. एम. पंडित, शिवाणी बिहाडे, नितेश धैर्य आदी मंचावर उपस्थित होते.तावडे म्हणाले, जेडीआयईटीच्या रूपाने दर्डा परिवाराने चांगली संस्था उभी केली आहे. असा प्रशस्त कॅम्पस मिळणे ही विद्यार्थ्यांना संधी आहे. इथे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रबंध सादर करण्याची संधी दिली जाते. ती पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांनाही मिळत नाही. त्यासोबतच आता अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ‘उद्योजक’ बनण्याचेही प्रशिक्षण दिले पाहिजे. पंतप्रधानांच्या ‘स्टार्ट अप इंडिया’साठी ते आवश्यक आहे. त्यावरच आता महाविद्यालयांचे ‘ग्रेडेशन’ ठरणार आहे.लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, आपली शिक्षण पद्धती अमेरिकन पॅटर्ननुसार सुरू आहे. पण आपण अमेरिकन पॅटर्नही पूर्णपणे स्वीकारलेला नाही अन् भारतीय पॅटर्नही पूर्णपणे घेतलेला नाही. आता आपल्याला चायना पॅटर्नकडे जाण्याची गरज आहे. विद्यार्थी केवळ ‘जॉब ओरिएन्टेड’ होताहेत. ‘इनोव्हेशन’ची कमतरता दिसते. आपल्याकडे कौशल्यावर आधारित शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने उच्च शिक्षण घेऊनही बेकारी वाढत आहे. शिक्षण विभागाने यात बदल करावा अशी अपेक्षा आहे.
शहरांप्रमाणे शिक्षणाचाही विकास आराखडा हवा - विनोद तावडे; जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीमध्ये ‘युफोरिया’चे धडाक्यात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 2:00 AM