भोर : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर; तसेच रोहिडेश्वर या गडकोट किल्ल्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. पायथ्याला शौचालय युनिट, टेन्ट बांधणे, म्युझियम, रेलिंग, रायरेश्वर मंदिर परिसर सुधारणा, पार्किंग आदी कामे होणार असून, २ कोटी ९६ लाख ४५ हजार रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील एक कोटी वर्ग करण्यात आल्याचे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी सांगितले. या दोन किल्ल्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करावा म्हणून शिवतरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाठे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार सुळे यांनी पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले होते. त्यानतंर पर्यटन विकासमंत्र्यांच्या सूचनेनुसार पर्यटन विभागाचे उपअभियंता दीपक हर्णे, शाखा अभियंता रणजित मुळे यांनी ९ मार्चला रायरेश्वर व रोहिडेश्वर या किल्ल्यांची पाहणी करून रायरी व बाजारवाडी या ग्रामपंचायतीची कागदपत्रे घेऊन दोन्ही किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करून पर्यटन विभागाला सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
रायरेश्वर, रोहिडेश्वराचा विकास आराखडा तयार
By admin | Published: April 03, 2017 1:41 AM