मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात उपलोकायुक्त नेमणार, निविदांसाठी संगनमत, निकृष्ट कामे करणे, ई-टेंडरला विरोध करणाऱ्यांविरुद्ध संघटित गुन्हे दाखल करण्याबरोबच संपूर्ण पारदर्शक कारभाराची हमी देणारा, तसेच विकासाचा बाँड आज जाहीरनामा म्हणून भाजपाने मुंबईकरांसमोर ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदींच्या उपस्थितीत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी आज पत्र परिषदेत हा जाहीरनामा मांडला. त्यानुसार, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, कंत्राटदार व त्यांच्या परिवाराची वार्षिक बॅलन्सशीट दरवर्षी जाहीर केली जाणार आहे. मुंबईकरांना येत्या पाच वर्षांत २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. पाच वर्षांपर्यंत ७५० लीटर प्रतिदिन प्रति कुटुंब पाण्याचे दर स्थिर ठेवणार, त्यापुढील वापरासाठी पाणीपट्टीमध्ये दरवर्षी ८ टक्के वाढ, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा हे पाणीप्रकल्प पूर्ण करणार, पाच वर्षांत खड्डेमुक्त मुंबई, उन्नत रेल्वेमार्गालगत २५० किमीचे उन्नत रस्त्यांचे जाळे उभारणार आणि मुंबईकरांना टोलमुक्ती अशी आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकांच्या जागांचा पब्लिक, प्रायव्हेट पार्टिसिपेशन (पीपीपी) मॉडेलअंतर्गत खासगी इस्पितळे आदींच्या उभारणीसाठी वापर करून २० हजार कोटी रुपयांचे घोटाळे करण्यात आले. त्यांची चौकशी भाजपाची महापालिकेत सत्ता येताच, निवृत्त न्यायाधीशांमार्फत केली जाईल, असे आ.आशिष शेलार यांनी सांगितले.
तिन्ही स्मारके पाच वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक, इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.