वैभववाडी : नापणे धबधब्याच्या परिसराचा पर्यटन विकास करण्यासाठी खासगी जमीन उपलब्ध होत नाही. त्यामुळे आहे तीच जागा विकसित करून नापणे धबधब्याच्या रुपाने वैभववाडी तालुका पर्यटनाच्या नकाशावर आणला जाईल. त्यासाठी लागणारा संपूर्ण निधी एकाच टप्प्यात आपण देऊ असे स्पष्ट करीत येत्या वर्षभरात धबधब्याच्या परिसराचे रूप पालटलेले दिसेल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.पालकमंत्री केसरकर यांनी दुपारी नापणे धबधब्याची पाहणी करून परिसराच्या सुशोभीकरणासह पायाभूत पर्यटन सुविधांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी प्रांताधिकारी संतोष भिसे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता छाया नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नियोजन समिती सदस्य सुशांत नाईक, गटविकास अधिकारी सदानंद पाटील आदी उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, नापणे धबधब्याचा विषय निघाला की जागा नाही असे सतत सांगितले जायचे. म्हणून आज प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा आहे त्या सरकारी जागेचा उपयोग करून अनेक सुविधा निर्माण करता येणार आहेत हे आमच्या लक्षात आले. हे बारमाही पर्यटन स्थळ असल्याने पर्यटक येतात. त्याचा स्थानिकांना काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
वैभववाडीत पर्यटनाचा विकास
By admin | Published: July 06, 2015 3:04 AM