- प्रशांत हेलोंडे । लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जगाचे प्रेरणास्थान असलेल्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमासह पवनार व वर्धा शहराच्या विकासासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सेवाग्राम विकास आराखड्याला चार वर्षांनी मूर्त रूप येत आहे. या आराखड्यांतर्गत ३१ कोटी ४६ लाख रुपयांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन टप्प्यांमध्ये १४५ कोटींची कामे करण्यात येणार असून याबाबतच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत.गांधी विचारांच्या संवर्धनासाठी ‘गांधी फॉर टुमारो’ हा प्रकल्प चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला. मात्र, तीन वर्षे केवळ चर्चा, परिपत्रकांत अडकलेला हा प्रकल्प आता ‘सेवाग्राम विकास आराखडा’ या नव्या नावाने प्रत्यक्षात उतरला आहे. निविदा प्रक्रियेनंतर जे. के. एंटरप्रायजेस, मुंबई या कंपनीला हे काम सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.