कणकवली : शिवसेना महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक भाजपासह युती करून लढली. मात्र, केवळ ५६ आमदार असताना हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना बाजूला टाकत आड मार्गाने महाआघाडी केली. उध्दव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविणार असे सांगून स्वत:च ते मुख्यमंत्री बनले.त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप कर्ज माफी दिलेली नाही. तर अधिवेशनात मुख्यमंत्री विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते काय? हा तर 'मुका' मुख्यमंत्री असून त्यांनी विकास कामांना दिलेली स्थगिती ही केवळ तोडपाणी करण्यासाठीच आहे. असा घणाघात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी येथे केला.कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे बुधवारी आयोजित भाजपा तालुका कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी जि़ल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, सरचिटणीस प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, सुरेश सावंत, रविंद्र शेटये, तालुकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, महिला तालुकाध्यक्ष गितांजली कामत, स्वाती राणे, प्रज्ञा ढवण, बबलू सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, कणकवली तालुका ही माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे या मतदार संघात येत्या आठ दिवसात भाजपचे १० हजार सदस्य झालेच पाहिजेत. कणकवलीची आकडेवारी संपुर्ण जिल्ह्याला लाजवेल, अशी असली पाहिजे. सक्रीय सदस्य व बुथ कमिट्या तातडीने पुर्ण करून द्या.
महाराष्ट्राच्या सत्तेत आलेल्या सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहोचवा. हे तीन पायाचे सरकार लोकहिताचे नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम सर्वच विकास कामांना स्थगिती सरकारने दिली आहे. कर्जमाफीची खोटी आश्वासने उध्दव ठाकरे यांनी दिली. आता १ महिना झाला तरी कर्जमाफीचा शब्द का पुर्ण केला नाही ?देवेंद्र फडणवीस आणि १०५ आमदार सरकार विरोधात झगडत आहेत. जनहितासाठी सरकारचा विरोध करून जनमाणसात आपल्या पक्षाबद्दल चांगली प्रतिमा तयार करा. त्यामुळे १०० टक्के बुथवर कार्यकर्ते दिसले पाहिजेत. तसेच यापुढे सर्वच निवडणुकांमध्ये भाजपालाच यश मिळाले पाहिजे.नागरीकत्व विधेयक केंद्रात भाजपा सरकारने का आणले? याची माहिती जनतेला द्या. देश स्वतंत्र झाला त्यावेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान , बांगलादेश या तीन देशातून अत्याचार झाल्यामुळे काही नागरीक सीमा भागात स्वत:च्या संरक्षणासाठी येऊन राहिले. त्या लोकांना अधिकृत नागरीकत्व देण्यासाठीच मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्या विधेयकाला राज्यसभेत मांडल्यानंतर मतदानाच्यावेळी शिवसेनेचे खासदार बाहेर निघून गेले.
सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व बाजूला ठेवले आहे. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मी नागपूरमध्ये जावून सत्ताधाऱ्यांचा प्रसिद्धिमाध्यमांसमोर समाचार घेणार असल्याचा इशाराही नारायण राणे यांनी दिला.अतुल काळसेकर म्हणाले, भाजपा आणि स्वाभिमान अशी एकत्र ताकद झाल्यामुळे येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आपणच जिंकायच्या आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघ निवडणूक , बांदा सरपंच तसेच आब्रंड जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे कार्यकर्त्यांच्या चांगल्या मनोमिलनाचा प्रत्यय आहे. या निवडणुकांनंतर जिल्हा बँकेवर भाजपाचा झेंडा फडकावयाचा आहे. राजन तेलींच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक निवडणुक लढली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.प्रमोद जठार म्हणाले, नव्या - जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रीत आणण्यासाठी हा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा घेण्यात आला आहे. पुढील काळातील पक्षाची दिशा ठरविण्यासाठी आम्ही मेळावे घेत आहोत. पुढच्या आठ दिवसात प्रत्येक बुथ सक्षम करून सशक्त भाजपा बरोबरच भारतासाठी काम केले पाहिजे. भाजपाच्या पक्ष संघटनेत विविध सात मोर्चा व २१ आघाड्या आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदारी घेण्याची संधी दिली जाणार आहे.जिल्ह्यात ३ हजार विविध पदांच्या नियुक्त्या पुढील काळात होतील. आगामी काळात स्थानिक निवडणुकांबरोबर लोकसभा, विधानसा निवडणुकीत भाजपाचे कमळ निश्चितच फुलेल. त्यासाठी कामाला लागा. शिवसेनेच्या वाघाची नखे आणि दात काढल्याने वाईट अवस्था झाल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. या मेळाव्याचे प्रास्ताविक राजन चिके, तर सुत्रसंचालन राजश्री धुमाळे यांनी केले..