शिर्डी : नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याने राज्याचा विकास दर मंदावला असला, तरी उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरच असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य पणन मंडळामार्फत खडकेवाके येथे उभारलेल्या राज्यातील पहिल्या फळे, भाजीपाला निर्यात सुविधा व प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले़ गेल्या तीन चार वर्षांत राज्य सरकारने आपत्ती निवारणासाठी दहा-बारा हजार कोटी रुपये खर्च केले़ गारपिटीत शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली. विशेष म्हणजे यातील ९० टक्के रक्कम महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली़़ नैसर्गिक आपत्तीत एवढ्या तातडीने देशात कोणतेही राज्य मदत करु शकलेले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उन्हाळ्यात जनावरांच्या छावण्या, पाण्याचे टँकर यावरही कोट्यवधी रुपये खर्च झाल्याने विकास योजनांना कात्री लावावी लागली. पावसाच्या अनियमिततेवर उपाययोजना म्हणून मोठ्या प्रकल्पांबरोबरच भूजल पातळी वाढण्याकरिता गावोगावी शेततळी, ओढ्यांवर साखळी बंधारे बांधावे लागतील़, असे चव्हाण म्हणाले. राज्यातील वस्त्रोद्योगात चाळीस हजार कोटींची गुंतवणूक झाली असून यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दहा लाख लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी व पणन विभाग एकत्र करण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसत आहेत. अॅग्रोपार्कच्या माध्यमातून विकासाचे नवे दालन खुले झाल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आपत्तीवरील खर्चाने विकास मंदावला
By admin | Published: August 11, 2014 3:38 AM