मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. याची जाणीव मी शरद पवारांपासून सर्वांना करून दिली आहे. यामुळे राज्यसभेवरून आम्हा तीन आमदारांची नावे संजय राऊतांनी घेतली व दगाफटका केल्याचा आरोप केला, यावर माझ्या मतदानाचा अधिकार राऊतांनाच द्यावा, असा खोचक टोला अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी लगावला आहे.
विधान परिषदेला गुप्त मतदान घेण्यात येणार आहे. राज्यसभेला आमच्यावर गुप्त होते म्हणूनच आक्षेप घेण्यात आला. विधानपरिषदेलाही आम्ही तुम्हालाच मतदान केले याचे पुरावे देऊ शकणार नाही, छातीठोकपणे सांगू शकणार नाही. यामुळे मी महाविकास आघाडीसमोर दोन पर्याय ठेवणार असल्याचे भुयार म्हणाले.
संजय राऊतांना माझ्या मतदानावेळी माझ्या टेबलसमोर उभे करावे किंवा संजय राऊतांनीच माझे मतदान करावे त्यांनीच शिक्का मारावा, निवडणूक आयोगाने विशेष बाब म्हणून माझ्या मतदानाचा अधिकार संजय राऊतांनाच द्यावा अशी विनंती करणार असल्याचा टोला देवेंद्र भुयार यांनी लगावला.
विधान परिषदेची येत्या २० जूनला निवडणूक होत आहे. भाजपाकडे मते कमी आहेत. यामुळे घोडेबाजार होईल असा आरोप शिवसेना करत आहे. राज्यसभेला अपक्ष आमदारांनी फसविल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. यावरून अपक्ष आमदार नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे हे मतदान गुप्त पद्धतीने होणार आहे. यामुळे शिवसेनेने आपल्या आमदारांना नेहमीच्या हॉटेलमध्ये न ठेवता दुसऱ्याच हॉटेलमध्ये ठेवले आहे. आज तातडीने शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.