नागपूर: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखली. यात गोव्याचाही समावेश आहे. या गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या खांद्यावर होती. गोव्यातील विजयानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपूरला आले, यावेळी नागपूरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील यावेळी उपस्थित होते. यादरम्यान जनतेला संबोदित करताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले, ''सध्या महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट येत आहे. या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात भाजपच्या लढ्यात सामान्य माणूस सोबत आहे. आम्ही या भ्रष्टाचारी सरकारचा बुर्खा फाडतोय, त्यामुळेच सामान्यांना लक्षात येतंय की, ही महाविकास नाही, महावसुली आघाडी आहे. या आघाडीचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहे. आता लढाई शिगेला पोहचतेय. आपल्या नेत्यांविरोधात खोटे केसेस टाकल्या, पण मला सरकारला सांगायचं आहे, तुम्ही कितीही केसेस करा, आम्ही तुमचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होणार, भाजप एकहाती सत्ता आणणार'', अशी गर्जना यावेळी फडणवीसांनी केली.
'गोव्याच्या जनतेचा आमच्यावर विश्वास'ते पुढे म्हणाले की, ''विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. पण, हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर भाजपचा आहे. गोव्यात काम करण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी मी भाजपचा आभारी आहे. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मदतीनेच मी संधीचे सोने केले. प्रचारादर्यान, नितीन गडकरीजी गोव्यात आले होते, तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले होते की, गेल्यावेळी तुम्ही एकटा आलात आणि सरकार स्थापन केले. त्यावर गडकरी म्हणाले होते, आता मी आणि देवेंद्र फडणवीस आहोत. आम्ही दोघे मिळून सरकार स्थापन करणार. झालेही तसेच, गोव्याच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही पुन्हा सत्ता आलो.''
'राष्ट्रवादी-सेनेची लढाई नोटाशी'यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोव्यातील युतीवर टोलाही लगावला. ''देशातील जनतेचा भाजपवर प्रचंड विश्वास आहे. मोदींचे नेतृत्व देशाला पुढे नेईल, असे लोकांना वाटते, म्हणूनच भाजपचा पाठिंबा वाढतोय. आमचे विरोधक देव पाण्यात टाकून बसले होते. 10 तारखेला भाजपचे सरकार जाईल म्हणायचे. पण, त्यांचे मुंगेरी लाल के हसीन सपने राहिले. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केली, आम्ही निवडून येणार अशी गर्जनाही केली. पण, सेना-राष्ट्रवादीची लढाई आमच्याशी नाही, तर 'नोटा'शी होती. दोन्ही पक्षांना नोटापेक्षा कमी मते मिळाली, त्यांचे डिपॉजीटही जप्त झाले,'' असा टोला त्यांनी लगावला.
'मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला'फडणवीस पुढे म्हणाले, ''गोवा असो, उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड किंवा मणिपूर असो, भाजपला मिळालेले मत देशाच्या विकासावर आणि नरेंद्र मोदींच्या विश्वासावर मिळाले आहेत. नरेंद्र मोदींच्या, गडकरींच्या नेतृत्वात देशाचा मोठा विकास झालाय. भाजपने आणलेल्या विकासाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचल्या. कोणीही उपाशी राहणार नाही, हे ब्रिद वाक्य मोदींचे होते. लॉकडाऊनच्या काळात कोणालाही उपाशी राहु दिले नाही. मोदींच्या नेतृत्वात लसीकरण झाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणले. त्यामुळेच देशातील लोकांचा भाजपवर विश्वास वाढत आहे,''असेही ते म्हणाले.