नागपूरः हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान फडणवीसांनी सामनामधल्या पवारांवरच्या टीकेचा हवाला देत राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर धनंजय मुंडेंनी आक्षेप नोंदवला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, या राज्यामध्ये सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात 1990नंतर 100पेक्षा अधिक जागा कुठल्या पक्षाला मिळाल्या असतील तर त्याचं नाव भाजपा आहे. आम्ही शिवसेनेसोबत महायुती करून लढलो. निवडणुकीनंतर आम्ही वाट पाहत होतो. ते आमच्यासोबत येतील. आमच्यासोबत येण्याऐवजी त्यांनी दुसरा मार्ग पत्करला, असाही टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवसेना म्हणते, बाळासाहेबांना शब्द दिला होता, शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर मुख्यमंत्री बनवू, असा शब्द शिवसेनेनं दिला होता का?, हा माझा प्रश्न आहे. की हा तुमचा शब्द होता का?, असंही फडणवीसांनी विचारले आहे.हिंदु हृदयसम्राट बाळासाहेबांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. आम्ही कुठेही असलो तरी बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी आदरस्थानीच राहतील, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला जनादेश दिलेला नाही. हे राजकीय स्वार्थाकरिता आलेलं सरकार आहे. जनतेच्या मनातलं तुम्ही सांगू नका, जनतेच्या मनात काय होतं. ते लोकसभा आणि विधानसभेतही दाखवलं आहे. जनतेनं या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं. जनतेच्या कौलाचा पराभव करून स्वार्थाकरिता आलेलं हे सरकार आहे. आमचे मित्र सुनील प्रभूंनी बाळासाहेबांआधी पवार साहेबांचं नाव घेतलं. पवारसाहेब हे मोठे नेते आहे, याबद्दल वाद नाही. पण या सरकारमध्ये किती विसंवाद आहे हे बघायचं असल्यास सामना आवर्जून वाचा. मला सामना वाचावा लागला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सामनातून शरद पवारांवर करण्यात आलेल्या टीकेला उल्लेख केला आहे.
''काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 1:58 PM