राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवतीर्थ या निवासस्थानी जात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याचा तपशील मात्र समोर आलेला नाही.
गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान, भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली होती. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये काही मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. त्याला भाजपाच्या नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंधांमध्ये पुन्हा एकदा दुरावा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान गाठत त्यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मुंबई महानगरपालिका तसेच आगामी निवडणुुकांसाठी युती होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र दोन्हीकडच्या नेत्यांनी त्याला कधीच दुजोरा दिला नाही. मात्र आता आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.