मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सरू असलेल्या सत्ता संघर्षाचा काल शेवट झाला. बंडखोर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे फडणवीस नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत भाजपमधील काही आमदार आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. पण, त्यांची देवेंद्र फडणवीसांनी समजुत काढली.
'कामाला लागा...'काल नवीन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंचे कामाला लागले. इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीसांनी काही नाराज आमदारांची तसेच भाजप कार्यकर्त्यांची समजुत काढली. हे सरकार आपलंच आहे, कोणीही नाराज होऊ नका, असे अवाहन फडणवीसांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सर्वांना आगामी 2024च्या निवडणूकीची तयारी करण्याचे निर्देशही दिले आहेत.
'जनतेसाठी कामे करायची'सरकारमध्ये सर्व आमदारांना निधी वाटप व्यवस्थित होईल. जनतेत जाऊन काम करणे थांबवू नका. आपल्याला जनतेसाठी काम करायचे आहे. अडीच वर्षात सर्व रखडलेली कामे मार्गी लावायची आहेत, जर कोणाची कामे रखडत असतील तर मला सांगा. हे सरकार आलेच आहे, नाराज होऊ नका आणि तयारीला लागा, असेही फडणवीसांनी सांगितले आहे. तसेच, उपमुख्यमंत्रीपद का स्विकारल्याचे कारणही त्यांनी आमदारांना यावेळी सांगितले.