मुंबई - गेल्या महिन्यात राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात सत्तांतर झालं होतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यानंतर मविआ सरकारने घेतलेले अनेक निर्णयही बदलण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावला आहे. दरम्यान, मविआ सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या आणि राज्यपालांनी रोखून धरलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्येही आता बदल होणार आहे. तसेच शिंदेगट आणि भाजपाकडून नव्या १२ जणांची यादी दिली जाणार आहे. आता या १२ आमदारांमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी भाजपामधील अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे १२ आमदार आहेत. आता या १२ आमदारपदांसाठी पात्र २०० लोक या सभागृहात आहेत. तर आतापर्यंत १२०० लोक मला बायोडाटा देऊन गेले आहेत. पण जे काही नियमात असेल त्याचं पालन करून, राज्यपालांचं समाधान झालं पाहिजे, अशा नियमांचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यातील काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. काही जागा आपल्याला मिळतील. भाजपामध्ये जी पद्धत आहे त्याप्रमाणे नियुक्त्या होतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपल्यापैकी अनेकांना वाटेल, याला घेतलं, माझ्यात काय कमी आहे. मी सुद्धा खूप काम केलंय. असं वाटणं साहजिक आहे. कारण प्रत्येकजण खूप काम करतोय, संघर्ष प्रत्येकाने केलाय. मात्र एकावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांना देता येत नाहीत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, पुढची अडीच वर्ष ही पुन्हा एकदा आपली घडी नीट बसवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यामुळे या काळात आपली एकजूट महत्त्वाची आहे. कुणी नाराज होण्याचं कारण नाही. ती नाराजी दूर करून एका मोठ्या लक्ष्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या पैकी कुणीही भाजपामध्ये सत्ता मिळवण्यासाठी आलेलो नाही आहोत. जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतात. जे पक्ष विचारांवर चालले तोपर्यंत चाललेत, ज्यावेळी विचारांऐवजी ते सत्तालोलूप झाले तेव्हा ते पक्ष संपलेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनंचं नाव न घेता लगावला.
ते पुढे म्हणाले की, भाजपामध्ये सामान्यातीला सामान्य प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान होऊ शकतो. कारण आपण घराणेशाही मांडणारा पक्ष नाही आहे, एखाद्या नेत्याच्या मुलांनी पक्षात येण्यास आपल्या पक्षात ना नाही. मात्र पक्षावर कुणाचा अधिकार नाही. याच्यानंतर याला दिलंच पाहिजे, अशा प्रकारचा कुठलाही अधिकार भाजपामध्ये नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला मेहनतीच्या आधारावर पुढे यायचं आहे. आज अनेक लोकं आपल्या पक्षात त्या प्रकारे पुढे येताहेत. त्यामुळे ज्या क्षणी आपण विचार सोडून आपण सत्तेच्या मागे लागू, त्यादिवशी भाजपाचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.