Sanjay Raut ED Summons, Chandrakant Patil: शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला दिवसेंदिवस मोठे धक्के बसत आहेत. या धक्क्यांच्या मालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा समजले जाणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही नवा धक्का बसला आहे. पत्राचाळ प्रकरण आणि पर्ल ग्रुप प्रकरण या प्रकरणांमध्ये संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कायम आपल्या शांत व मिस्किल शैलीतील उत्तरांसाठी ओळखले जातात. आजदेखील पत्रकारांनी त्यांना संजय राऊतांना ईडीने बजावलेल्या समन्सबाबत काही प्रश्न विचारले. त्यावर चंद्रकांतदादांनी हसत-हसतच मोजक्या वाक्यांत उत्तर दिलं.
संजय राऊतांना ईडीची नोटीस आली. ते शिवसेनेची बाजू आक्रमकपणे जनतेसमोर मांडत असल्याने त्यांना ही नोटीस येणार हे अपेक्षितच होतं असं स्वत: संजय राऊत म्हणाले. याबाबत पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारताच ते म्हणाले, "संजय राऊतांना ईडीची नोटीस आल्यानंतर ते म्हणतात की त्यांना हे अपेक्षित होतं. पण संजय राऊत काय म्हणतात याचा काही संबंध नाही. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स विभाग या सर्व स्वायत्त संस्था आहेत." त्याचपाठोपाठ पत्रकारांनी आणखी एक प्रश्न विचारला. 'संजय राऊत म्हणतात की ईडीच्या प्रकरणात त्यांना आता मुद्दाम अटक करण्यात येऊ शकते यावर तुमची भूमिका काय', असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील हसत हसतच म्हणाले, "राऊत हल्ली जे काही बोलतात, त्यावरून राऊतांच्या बाबतीत आता हे जगजाहीर आहे की ते काहीही म्हणू शकतात."
दरम्यान, ईडीकडून संजय राऊतांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये दिसताच, राऊतांनी एक ट्वीट करत थेट भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. "मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही. या मला अटक करा! जय महाराष्ट्र!", असे ट्वीट संजय राऊतांनी केले असून त्यात देवेंद्र फडणवीसांना थेट टॅग केले.