मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. कोश्यारी यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा विरोधकांकडून तीव्र विरोध होत आहे. या विरोधावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे हिरोआज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही, राज्यपालांच्या मनातही याबद्दल शंका नसावी.'
'भगतसिंह कोश्यारी यांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात किंवा भारतात असू शकत नाही. सुधांशू त्रिवेदी यांचेही वक्तव्य मी नीट ऐकलं आहे. त्यांनी कुठल्याही वक्तव्यात महाराजांनी माफी मागितली, असे म्हटले नाही,' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पंतप्रधानांनी गांभीर्यानं दखल घ्यावी- अजित पवारअजित पवार म्हणाले की, 'महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे,' अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.