पुणे: रामनवमीपासून देशातील अनेक भागात जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारावरुन विरोधक भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजपवर दंगली पेटवल्याचा आरोप केला आहे. त्या आरोपाला आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बोचऱ्या शब्दात उत्तर दिलंय. "संजय राऊत यांना काही काम धंदा नाही," अशी टीका फडणवीसांनी केली.
'कोल्हापूरच्या निकालावर समाधानी'पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केले. यावेळी त्यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवावरही भाष्य केले. ते म्हणाले की, "निवडणुकीत आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. आम्ही एकटे लढूनही आमच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आमच्याविरोधात तीन पक्ष एकत्र होते, तरीदेखील त्यांची मते वाढली नाहीत. कोल्हापूरमध्ये सिंपथीमुळे काँग्रेसचा विजय झाला. पण, 2024 मध्ये कोल्हापूरची ही जागा आम्हीच जिंकणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'संजय राऊत यांना काही काम-धंदा नाही'देशात दंगली पेटवम्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्या आरोपाबाबत पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "संजय राऊत अतिशय फ्रस्ट्रेटेड व्यक्ती आहे. त्यांना सध्या काही कामधंदा उरलेला नाही. त्यांच्यावर कितीवेळा बोलायचं?" अशी बोचरी टीका फडणवीसांनी यांच्यावर केली.
'अयोध्येला कोणीही जाऊ शकतं'यावेळी फडणवीसांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, "अयोध्येचा दौरा कुणीही करू शकतो. प्रभू रामचंद्र सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी कुणी जात असेल तर त्याचं स्वागतच आहे. आम्हीदेखील अनेकदा त्या ठिकाणी जात असतो. कोणाला तिकडे जावं वाटतं असेल, तर त्यात गैर काही नाही. श्री रामाचे भव्य मंदिर तिकडे होत आहे, ते पाहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे."