'देवेंद्रभाऊ, तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:52 PM2020-01-07T12:52:40+5:302020-01-07T12:58:31+5:30
काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांचा खोचक सल्ला
नागपूर: सत्ता गमावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरु रामदेव बाबांकडे जाऊन आत्मचिंतन करावं असा सल्ला काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. फडणवीसांना पराभवाचं आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जायला हवं, असं केदार म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपानं जोर लावला आहे. सत्ता गेल्यानं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. तर राज्यात सत्ता स्थापन केल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजपाला लक्ष्य केलं. फडणवीस यांनी पाच वर्षे सत्ता कोणासाठी वापरली, पक्ष संघटना किती बळकट केली, हे आता कळेलच. आपल्याला जनतेनं का पराभूत केलं याचं चिंतन त्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जावं, असा टोला केदार यांनी लगावला. यावेळी त्यांना माजी मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बावनकुळेंना त्यांच्याच पक्षानं चिंतन करण्यास सांगितलं आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असा सवाल करत चिमटा काढला.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीही नागपूर जिल्हा परिषदेत शिवसेना स्वतंत्र लढत आहे. निवडणूक निकालानंतर नागपुरमध्ये महाविकास आघाडी दिसणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला त्याची गरज भासणार नाही, असं उत्तर केदार यांनी दिलं. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यामुळे इतर गोष्टींची चर्चा नको, असं केदार म्हणाले.