नागपूर: आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी केली. यामुळे आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, आजच्या स्वाक्षरीपूर्वी शिवसेनेनं सामनामधून कोश्यारींवर बोचरी टीका केली होती. आता त्या टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी
मीडियाशी संवाद साधताना फडणवीसांनी सामनातील टीकेवर भाष्य केलं. ते म्हणाले, 'राज्यपालांवर सामनातून करण्यात आलेली टीका दर्जाहीन आहे. राज्यपाल पदाचा सन्मान समजुन घ्यायला पाहिजे होता. महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांनी चूक दाखवून दिली होती. ही चूक राज्य सरकारला सुधारावी लागली, त्यामुळे त्यांची मळमळ आणि तळमळ सामनातील टीकेवरुन दिसतेय', असं फडणवीस म्हणाले.
...नाहीतर अध्यादेशाला स्थगिती मिळाली असतीफडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकारकडून सुरुवातीला आलेल्या अध्यादेशात काही त्रुटी होत्या. तो अध्यादेश राज्यपालांनी मंजूर केला असता, तरी न्यायालयाकडून त्यावर स्थगिती आली असती. ही चूक राज्यपालांनी सरकारच्या लक्षात आणून दिली', असं फडणवीस म्हणाले. तसेच,' सुप्रीम कोर्टात केंद्रानं वेळ वाढवून मागितली नसून राज्य सरकारनंच वेळ वाढवून घेतलीय', अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.