शिंदे बोलत होते, बोलत होते, पण तिकडे फडणवीस घाबरलेले; अजित पवारांनी नेमके तेच हेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 05:56 PM2022-07-04T17:56:07+5:302022-07-04T17:58:12+5:30
Ajit Pawar Speesch After Opposition Leader: लोकप्रिय घोषणांवर हा असा खर्च केला तर विकासकामांना निधी कमी पडेल, असा सल्लावजा इशाराही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कपातीच्या निर्णयावर अजित पवारांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे हे माझ्या बघण्यात २००५ पासून विधानसभेत आहेत. परंतू आजवर त्यांना अशाप्रकारे मनमोकळेपणे बोलताना कधीही पाहिले नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला. याचबरोबर बाजुला देवेंद्र फडणवीस बसलेले होते, त्यांच्या चेहऱ्यावरील गोष्टी काही वेगळेच सांगत होत्या, असेही मी हेरल्याचे अजित पवारांनी सभागृहात सांगितले.
सरकार म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, राज्यातील अनेक वस्तूंच्या किंमती वाढत गेल्या आहेत. त्या कमी व्हाव्यात. अलीकडच्या काळात लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले, पंजाब त्याचे उदाहरण आहे. लोकप्रिय घोषणांवर हा असा खर्च केला तर विकासकामांना निधी कमी पडेल, असा सल्लावजा इशाराही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कपातीच्या निर्णयावर अजित पवारांनी दिला आहे.
तसेच आमच्याकडून विरोधाला विरोध होणार नाही, असे आश्वासनही पवारांनी दिले. उद्धव ठाकरे, फडणवीस यांच्यापैकी विठ्ठलाची पूजा कोण करणार, अशी चर्चा रंगलेली. परंतू एकनाथ शिंदेच ही पूजा करणार आहेत. राज्याच्या १३ कोटी जनतेकडून तुम्हाला पूजेला जाण्याचा मान मिळालेला आहे, असेही पवार शिंदेंना म्हणाले.
यावेळी अजित पवारांनी इकडे एकनाथ शिंदे बोलत असताना तिकडे बाजुला बसलेल्या फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे वर्णन केले. एकनाथ शिंदे बोलत होते, बोलत होते, बाजुला बसलेल्या फडणवीसांच्या चेहऱ्यावर भीतीचे चिन्ह होते. मागे बसलेले दीपक केसरकर, गुलाबराव पाटील देखील एका अनामिक भीतीखाली होते. शिंदे बोलत होते, टाळ्या घेत होते, त्यांचा मुख्यमंत्री म्हणून कुठे शब्द चुकेल, काहीतरी वेगळेच बाहेर पडेल या भीतीत फडणवीस होते. ते त्यांना हाताने, बोलून आता तरी थांबा असे खुनावत होते, असे आपण हेरल्याचे पवार म्हणाले.