मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीला अजून 2 वर्षे बाकी आहेत. पण, भाजपकडून या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत सूचक विधान केले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजप तयारी करत असून, सध्या ताब्यात नसलेल्या मतदारासंघावर जास्त लक्ष देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
'त्या जिल्ह्यात जास्त लक्ष देणार'आज भाजप नेत्यांची बैठक पार पडली, यात आगामी निवडणुकांवर चर्चा झाली. यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन 48' ची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, "आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काम कस करायचं, त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचे आहे. राज्यात असलेल्या 48 पैकी 48 लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेषतः ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला, त्या ठिकाणी जास्त लक्ष दिले जाईल," अशी माहिती फडणवीसांनी दिली.
'काँग्रेसचे आंदोलन चुकीचे'यावेली फडणवीसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीच्या कारवाईवरुन देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरही भाष्य केले. "खासदार राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन करणे चुकीचे आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचा परवाना देशात कुणाला नाही. चौकशीवेळी तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचे काम काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून करतंय. एजीएलची संपत्ती गांधी कुटुंबाने लाटली असा आरोप त्यांच्यावर आहे,'' असं फडणवीस यांनी म्हणाले.
'MIM ही शिवसेनेची बी टीम '"MIM ने शिवसेनेला मतदान करून उमेदवाराला निवडून आणलं आहे. MIM शिवसेनेची बी टीम आहे हे सिद्ध झाले आहे. ए टीमला मदत होणारी वक्तव्य जलील करत आहेत. भाजपा कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. भाजपा पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे," असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी जलील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.