कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर भाजप नेत्यांकडूनही राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि गृहविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, यावर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आज फडणवीस कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना अनिल बोंडे यांच्या मागणीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले की, "अनिल बोंडे यांनी केलेली मागणी त्यांची वयक्तिक आहे. ती त्यांची भूमिका आहे, पक्षाची नाही,"असे म्हणत त्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, कोल्हापुरातून भाजपचा 107 वा आमदार निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'हनुमान चालिसेचा राग का?'यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मनसेच्या हनुमान चालिसा लावण्यावरही भाष्य केले. आज राम नवमीनिमित्त मनसेकडून विविध ठिकाणी हनुमान चालिसा लावली जात आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "हनुमान चालिसा ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. काही लोकांना हनुमान चालिसेचा इतका राग का येतो, हेच मला कळत नाही. भोंगे वाजल्याचा राज येत नसेल, तर हनुमान चालिसेचा राग येण्याचे कारण नाही,"असे फडणवीस म्हणाले.
'शिवसेना सुडो सेक्युलर'यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवरही जोरदार निशाणा साधला. "मागे एकदा शिवसेनेच्या विभागप्रमुखाने उर्दू कॅलेंडर काढून त्यात जनाब बाळासाहेब ठाकरे, असा उल्लेख केला होता. तेव्हाच शिवसेना सुडो सेक्लुलरवादी झाली. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही, प्रार्थनेला विरोध नाही. पण, शिवेसेनाच अजानचे क्लास घेत असेल, तर प्रश्न निर्माण होणारच," अस फडणवीस म्हणाले.