गडचिरोली: गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर, आता आज विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ''कोरोना काळात आदिवासींना मदत करा, असा आक्रोश आम्ही करत होतो. पण, राज्य सरकारने दारू दुकानदारांना मदत केली," असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.
'सरकारमध्ये हिम्मत नाही...'आज भाजपच्या वतीने गडचिरोली येथून जनआक्रोश मोर्चाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''कोरोना काळात आदिवासींना मदत करा, असा आक्रोश आम्ही करत होतो. पण, राज्य सरकारने दारू दुकानदारांना मदत केली. सरकारने गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबारच्या शेतकऱ्यांचे पन्नास टक्के वीज बील माफ केले नाही. राज्य सरकार आपला आवाज दाबू शकत नाही, या सरकारमध्ये आवाज दाबण्याची हिम्मतही नाही. आम्ही जनतेवर अन्याय सहन करणार नाही, अन्याय झाला तर ही जनता तक्त पालटून टाकेल," अशी टीका फडणवीसांनी केली.
'भ्रष्टाचाराची 20-20 मॅच सुरू'फडणवीस पुढे म्हणाले, "हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे, सरकारमध्येच सध्या भ्रष्टाचाराची 20-20 मॅच सुरू आहे. दोन्ही टीम यांच्याचं आहेत, जिथे जाऊ तिथे खाऊ असं हे सरकार आहे. मुंबईतून बिल्डरांचा थकलेला कर घ्या आणि शेतकऱ्यांना वीज द्या. पण हे सरकार बिल्डरांवर मेहरबान आहे, कारण ते त्यांना मालपानी देतात. कोरोनात यांनी बारमालकांचे भले केले. सरकारने 50 टक्के दारु लायसन्सची फी रद्द केली, विदेशी दारुवरचा कर अर्धा केला. या महाराष्ट्रात बेवड्यांचं सरकार आलं, त्यांना बेवड्यांचे हित जास्त आहे," असाही घणाघात त्यांनी केला.
'वेश्यांच्या पैशावर डल्ला मारणारं सरकार'फडणवीस पुढे म्हणाले की, ''सरकारने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना 5 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली, एवढे एकच चांगले काम सरकारने केले. मात्र, यातही पैसा खायचे काम त्यांनी सोडले नाही. सरकारच्या निकटवर्तीयांना, जवळच्या संस्थांना हा निधी दिला. मी स्वत: नांदेडमधील घटनेचा उल्लेख विधानसभेच्या अधिवेशनात केला होता. सरकारने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणारा निधी हडप केला. म्हणजे या सरकारला काय म्हणावं, मी तो शब्द उच्चारणार नाही," अशी बोचरी टीकाही फडणवीसांनी केली.