मुंबई: उद्या मुंबईतील बीकेसी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा होणार आहे. यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. आज भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) सभास्थळाच्या कामांची पाहणी केली. यावेळी फडणवीसांनी येणाऱ्या लोकांची सोय आणि सुरक्षेचाही आढावा घेतला. तसेच, आदित्य ठाकरे (ditya Thackeray) यांच्यावरही टीका केली.
यांची दुकानदारी बंद होणारसभास्थळी देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणावरुन आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. त्यावर फडणवीसांनी पलटवार केला. 'ज्या लोकांची हयात फक्त घोटाळे करण्यात गेली, त्यांनाच दु:ख होत आहे. काँक्रिटचे रस्ते केले तर पुढील 40 वर्षे टिकतील आणि नवीन रस्ते होणार नाही. यामुळे त्यांची दुकानदारी बंद होईल. त्यामुळेच त्यांची ओरड सुरू आहे', असा टोला फडणवीस यांनी लगावला.
फडणवीस पुढे म्हणाले, 'मी मुख्यमंत्री असताना महापालिकेच्या रस्त्यांची चौकशी झाली होती. 200 रस्त्यांच्या खालील लेअरच गायब होती, अशी माहिती तेव्हा मिळाली आणि हे आम्हाला रस्त्यांच्या मुद्द्यावरुन बोलत आहेत. टक्केवारी ठरली नाही म्हणून त्यांनी रस्त्याचे टेंडर काढले नाही, आम्ही मात्र वर्क ऑर्डर दिले. यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी 15 वर्ष रस्तेच झाले नसते. त्यांचा भ्रष्टाचार उखडून टाकण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत,' असंही फडणवीस म्हणाले.