मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडूनही कंबर कसली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गुरुवारी (दि.१२) भाजप नेत्यांचे विचारमंथन झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले. तसेच, महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना दिला. याशिवाय, सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा. अधिकाधिक वेळ आपापल्या मतदारसंघात द्या. मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामे तात्काळ मार्गी लावा, अशा सूचना देत लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना दिले.
दरम्यान, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर आढावा घेण्यासाठी स्वतःचे सर्व्हे सुरू केले आहेत. भाजपकडून राज्यभरात असे अंतर्गत सर्व्हे सुरू आहेत. अशातच भाजपने विदर्भात केलेल्या अंतर्गत सर्व्हेची माहिती समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला फक्त २५ जागा मिळत असल्याची असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे हा सर्व्हे महायुतीची चिंता वाढवणारा आहे.
विदर्भात भाजपला १८, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला २ जागा भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महाविकास आघाडीला २५ जागा मिळत असल्याचे समोरआले आहे.त्यात भाजपला १८ जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५ जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या महायुतीकडे विदर्भातील ६२ पैकी ३९ आमदार आहेत. नागपूर जिल्ह्यात १२ पैकी भाजपाला फक्त ४ जागा मिळत असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.